साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 19 मार्च 2020
अहमदनगर |अहमदनगर मध्ये आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 2 झाली आहे. सदर रुग्ण जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातील आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 49 वर पोहोचली आहे.
काल (दि.18) श्रीरामपूर शहरातील गोंधवनी रस्त्यालगतच्या परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला नगर जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठवले आहे. हा तरुण नुकताच दुबई येथून आला होता.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याचे सांगितले. यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील एक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते .त्यानंतर हा दुसरा रुग्ण आढळून आला आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ४९ वर पोहोचली असून दोघे व्हेंटिलेटरवर आहेत. तर इतरांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या १२ तासात ७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लंडनमधून आलेली मुंबईतील महिला आणि दुबईहून परतलेले अहमदनगरमधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
४९ पैकी ४० कोरोनाबाधित हे बाहेरच्या देशातून आलेले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण कमी असलं तरी याचा धोका वाढला आहे. त्यामुळे जनतेने राज्य सरकारने दिलेल्या सूचनाचं पालन करावं, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग टाळता येईल, असंही राजेश टोपे म्हणाले.