साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 13 मार्च 2020
श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र गळनिंब येथील नवसाला पावणार्या श्री सिद्धेश्वराच्या यात्रोत्सवास आज शुक्रवारपासून (दि.13) मोठ्या दिमाखदार सोहळ्याने प्रारंभ होत आहे. श्रीक्षेत्र पुणतांबा येथून भाविकांनी आणलेल्या कावडीच्या पाण्याने श्री सिद्धेश्वराचा जलाभिषेक करण्यात येतो.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते अभिषेक करण्यात आल्यानंतर गावामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई व इतर दुकानांना यात्रा कमिटी बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देते त्यानंतर मंदिर परिसरामध्ये यात्रा कमिटी आलेल्या भाविकांचे स्वागत करते.
सायंकाळी चंद्रोदयानंतर फटाक्यांच्या आतषबाजीने, बँड पथकाने दमदार वाजत गाजत रथाची मिरवणूक मोठ्या दिमाखदार सोहळ्यामध्ये होते यावेळेस हा सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्याबरोबरच जिल्ह्याबाहेरील भाविकही श्रीसिद्धेश्वराच्या या यात्रेसाठी हजेरी लावतात. रथाची मिरवणूक संपल्यानंतर भाविकांच्या करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम करण्यात येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी हजऱ्यांचा कार्यक्रम होतो. बैलगाडी शर्यती व हंगाम्याने कार्यक्रमाची यात्रेची सांगता होते. यात्रा यशस्वी करण्यासाठी श्री सिद्धेश्वर यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रा.सोहंम चिंधे, उपाध्यक्ष अण्णासाहेब जाटे, सचिव अण्णासाहेब कडनोर, श्रीसिद्धेश्वर विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ प्रयत्नशील आहे तरी या यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.