अहमदनगर : आणखी २५ व्यक्तींचा 'कोरोना संसर्ग' अहवाल निगेटीव्ह

आणखी २५ व्यक्तींचा 'कोरोना संसर्ग' अहवाल निगेटीव्ह 
  

साईकिरण टाइम्स ब्युरो, 21 मार्च 2020 
अहमदनगर : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा पोलीस दल प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. मात्र, अद्यापही या विषाणू संसर्गाचे गांभीर्य काही नागरिकांना लक्षात येत असल्याचे दिसत नसल्याने यापुढील काळात कठोर उपाययोजना जिल्हा प्रशासनाला कराव्या लागतील, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येक नागरिकाने या विषाणू संसर्गाचा धोका ओळखावा आणि सामाजिक बांधिलकी म्हणून तसेच स्वताच्या व समाजाच्या आरोग्यासाठी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.

            जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी आज प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अनिल बोरगे आदी यावेशी उपस्थित होते.

            श्री. द्विवेदी म्हणाले, नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस विभागासह आवश्यक यंत्रणा धावपळ करीत आहेत. त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही केले आहे. त्यासाठी विविध आस्थापना बंद करण्याचे आदेश यापूर्वीच जारी केले आहेत. मात्र, सुटी समजून नागरिक इतरत्र विनाकारण फिरताना दिसत आहे. हे चित्र अहमदनगर जिल्हावासियांसाठी भूषणावह नसून धोका वाढविणारे आहे. त्यामुळे नागरिकांनी या विषाणू प्रादुर्भावाचे गांभीर्य समजून घ्यावे आणि घराबाहेर पडणे टाळावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

            दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील १९४ व्यक्तींची तपासणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आज एनआयव्हीकडून २५ व्यक्तीचे स्त्राव नमुना अहवाल प्राप्त झाला असून तो निगेटीव आला आहे. सध्या ४५ व्यक्तींचे स्त्राव नमुना अहवाल येणे बाकी असून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तर निगेटीव अहवाल आलेल्या व्यक्तींना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्या हातावर तसे शिक्के मारण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

            दरम्यान, प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्ल्ंघन करणार्‍या शहरातील ३५ पेक्षा जास्त दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. तर विनाकारण बंदी आदेश डावलून रस्त्यांवर फिरणार्‍या १३२ जणांवर कारवाई करण्यात आली. बंदी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी  शहरात १२ पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

            दरम्यान, परदेशातून परत आलेल्या व्यक्तींची केवळ जिल्हा रुग्णालयातच तपासणी केली जात आहे. इतर कोणत्याही रुग्णालयात नाही. त्यामुळे अशा व्यक्तींनी केवळ जिल्हा रुग्णालयातच तपासणी करुन घ्यावी. याबाबत कोणत्याही अफवा अथवा खोटी माहिती पसरवणार्‍यांवर पोलिसांचा सायबर सेल कारवाई करेल, असे श्री. द्विवेदी यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका, माहितीची अधिकृत स्त्रोतांकडून खात्री पटल्याशिवाय अपूर्ण, अर्धवट, खोटी, दिशाभूल करणारी माहिती पसरवू नका. असे प्रकार करणार्‍याविरोधात जिल्हा पोलीस दलाचा सायबर पोलीस विभाग कार्यवाही करेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.  

            अनेक खाजगी वाहतूक करणार्‍या वाहनांमार्फत जास्त प्रवाशी वाहतूक केल्या जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. यासंदर्भात परिवहन विभाग आणि पोलीस विभाग अशा वाहनांवर कार्यवाही करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्याठिकाणी जास्त संपर्क येत असेल, तेथे विषाणू संसर्ग प्रसाराचा धोका जास्त आहे. त्यामुळे यासंदर्भातील काळजी नागरिकांनीही घ्यावी, असे ते म्हणाले.  

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post