साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 मार्च 2020
संभाजीनगर :विदेश दौऱ्यावरून येताच कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या संभाजीनगर येथील एका महाविद्यालयातील प्राध्यापिकेला निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर आज येथील खासगी रुग्णालयातून दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रामध्ये या व्हायरसने थैमान घातले असतानाच संभाजीनगरमधील डॉक्टरांच्या अथक परिश्रमांनी या पॉझिटिव्ह महिलेला उपचाराअंती बरे केले. तिचा दुसऱ्यांदा पाठवलेला स्वाबचा अहवालही निगेटिव्ह आल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच सोमवारी तिला डिस्चार्ज देण्यात आला.
सदर प्राध्यापिका 3 मार्च रोजी रशिया आणि कजाकिस्तान येथून संभाजीनगरात आली होती. त्यानंतर या प्राध्यापिकेने महाविद्यालयात अध्यापनही केले. त्यानंतर बरे वाटत नव्हते म्हणून तिची तपासणी करताना ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळली. त्यानंतर या प्राध्यापिकेला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नोडल ऑफिसर तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले.
ही महिला मराठवाड्यातील पहिली कोरोना पॉझिटिव्ह ठरली होती. त्यानंतर या रुग्णालयातील डॉक्टरांनी हेवी अँटिबायोटिक्स आणि दोन इतर अँटीव्हायरसचे डोस दिल्याने या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. त्यानंतर तिचं स्वॅब पुना पुणे येथील एन आयही प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. तो अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर दोन दिवस या महिलेला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आणि सोमवारी नोडल अधिकाऱ्यांच्या आणि प्रशासनाच्या परवानगीने दुपारी पावणेतीन वाजता डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात मुंबई पुणे सारख्या शहरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना संभाजीनगर येथील सर्वच इस्पितळातील डॉक्टर, महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी, आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने तत्परता बाळगण्यामुळे संभाजीनगर शहर आज तरी कोरोना मुक्त झाल्याचे बोलले जात आहे.
असे असले तरी शहरात नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे आणि मार्गदर्शन यांचे तंतोतंत पालन केल्यामुळे संभाजीनगरात आज तरी कोरोना पॉझिटिव्ह एकही रुग्ण कोणत्याही रुग्णालयात उपचार घेत नाही किंवा दाखल झाला नाही असे विविध रुग्णालयांचे कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक नोडल ऑफिसर डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.