अहमदनगर : जिल्ह्यात आढळले आणखी दोन कोरोना बाधित दोघेही परदेशी नागरिक: एक फ्रान्स तर दुसरा आयव्हरी कोस्टचा


त्यांच्याशी संबंधित ०९ व्यक्तींना घेतले ताब्यात: संपर्कातील इतर व्यक्तींचा शोध सुरु ; 
जिल्हा यंत्रणा सतर्क; बाधित व्यक्ती राहिलेला परिसर केला सील 

साईकिरण टाइम्स ब्युरो, 29 मार्च 2020
अहमदनगर : जिल्ह्यात आज आणखी दोन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे पुण्याच्या एनआयव्हीने दिलेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. या व्यक्ती परदेशी नागरिक असून त्यातील एक फ्रान्स तर दुसरी व्यक्ती आयव्हरी कोस्ट येथील आहे. या व्यक्तीसोबत असणार्‍या इतर व्यक्तींनाही ताब्यात घेतले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध आता पोलीस आणि आरोग्य यंत्रणेने सुरु केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.  
    या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांनी स्वताहून जिल्हा रुग्णालयात येऊन त्यांची तपासणी करुन घ्यावी, तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दीत जाणे टाळावे.स्वताच्या आणि समाजाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, या व्यक्ती थांबलेल्या परिसराला सील करण्याचे आणि हा परिसर औषध फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

         या दोन व्यक्तीसह १४ जणांचा ग्रुप मॉरिशस येथून दिल्ली येथे आला होता. त्यानंतर हा ग्रुप २ आठवडे दिल्ली येथे थांबला. या कालावधीत त्यांनी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि पुन्हा दिल्ली असा प्रवासही केला. विविध ठिकाणांना भेटी दिल्या. दिनांक १४ मार्च रोजी रेल्वेने हे सर्वजण नगर येथे आले. ते शहरातील मुकुंदनगर भागात राहिले. दुसर्‍या दिवशी ते जामखेडला रवाना झाले. तेथे ते २६ मार्चपर्यंत होते. मात्र या व्यक्ती तेथे राहत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलीस, महसूल प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने कार्यवाही करुन या १४ जणांना ताब्यात घेत थेट जिल्हा रुग्णालयात पाठवले. काल या १४ जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडून एनआयव्हीकडे पाठविण्यात आले. त्यापैकी ५ स्त्राव नमुन्यांचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यातील या दोन व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले. इतर तीन जणांचा अहवाल निगेटीव आला असून उर्वरित ०९ अहवाल अद्याप येणे बाकी आहे. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून बाधित दोन रुग्णांना बूथ ह़ॉस्पिटलमधील आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात पाठवले जाणार आहे.
            यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या पाच झाली असली तरी एका रुग्णाचा १४ दिवसांनंतरचा अहवाल निगेटीव आल्याने त्याला घरी सोडण्यात आले होते. त्यामुळे आयसोलेशनमध्ये सध्या ०४ जणांना ठेवण्यात आले आहे.

          दरम्यान, आता आज कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची माहिती जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणेकडून काढली जात आहे. मुकुंदनगर आणि जामखेड या भागात ज्याठिकाणी या व्यक्ती राहिल्या, तेथे त्यांना अनेकजण भेटल्याची शक्यता गृहित धरुन प्रशासनाने माहिती घेणे सुरु केले आहे. मुकुंदनगर परिसर आता सील करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरु केली आहे. तसेच, मुकुंदनगर आणि जामखेड येथील ज्या व्यक्ती या बाधित नागरिकांच्या संपर्कात आल्या, त्यांनी स्वताहून पुढे येऊन त्यांची आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
             परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणचा संपर्क टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी केले आहे. प्रशासनातील सर्व यंत्रणा या जिल्ह्याचे आरोग्य व्यवस्थित राहावे, यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना नागरिकांनी साथ दिली पाहिजे. जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, ते नागरिकांच्या हितासाठीच आहेत, त्यामुळे त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

  

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post