Coronavirus Breaking
साईकिरण टाइम्स ब्युरो | दि.19 मार्च 2020
अहमदनगर | राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठविलेल्या ५८ स्त्राव नमुन्यापैकी जिल्ह्यातील आणखी एक व्यक्ती कोरोना संसर्ग बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हयातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन झाली असून ज्यांचे अहवाल निगेटीव आले आहेत अशा ५६ व्यक्तींना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे तर ५ जणांना जिल्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ६३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत. सार्वजनिक ठिकाणचा संपर्क टाळा. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा, असे आवाहन राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.
सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती प्रसारित करु नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आता वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. जिल्हा यंत्रणेबरोबरच आता महसूल, आरोग्य आणि पोलीस दलाच्या सहकार्याने ग्रामीण भागातही गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विनाकारण सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणार्या व्यक्तींवर कार्यवाही केली जाणार आहे. यासंदर्भात तालुकास्तरीय यंत्रणांना सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत ६३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ५८ व्यक्तींचे स्त्राव नमुन्यांचा अहवाल पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून प्राप्त झाला. त्यात ५६ जण हे कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले. तर दोन व्यक्ती बाधित आढळून आल्या. आज बाधित आढळलेली व्यक्ती ही दुबईहून प्रवास करुन आल्याची माहिती देण्यात आली. नमुना चाचणी निगेटीव आल्याने ५६ जणांना घरी सोडण्यात आले असून त्यांना तेथे घरी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. पाच व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान, परदेशातून परत आलेल्या व्यक्तींची केवळ जिल्हा रुग्णालयातच तपासणी केली जात आहे. इतर कोणत्याही रुग्णालयात नाही. त्यामुळे अशा व्यक्तींनी केवळ जिल्हा रुग्णालयातच तपासणी करुन घ्यावी. याबाबत कोणत्याही अफवा अथवा खोटी माहिती पसरवणार्यांवर पोलिसांचा सायबर सेल कारवाई करेल, असे श्री. द्विवेदी यांनी स्पष्ट केले. रक्त चाचणी संदर्भात खोटा मेसेज सोशल मीडियावरुन व्हायरल करणार्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, महानगरपालिका आयुक्त एस.एन. म्याकलवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्याशी चर्चा केली. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा करीत असल्याच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. या प्रयत्नांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, विनाकारण अनावश्यक प्रवास टाळावा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, गर्दीची ठिकाणे टैाळावीत, वारंवार हात धुवावेत, अशी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हावासियांना केले. या आपत्तीतून आपण निश्चितपणे बाहेर येऊ, त्यासाठी संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी संपर्क मर्यादित केला पाहिजे. अत्यावश्यक कारण असल्याशिवाय सुटी असली तरी घराबाहेर पडू नका, असे ते म्हणाले.
जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला यासंदर्भात आवश्यक उपकरणे अथवा काही साहित्य हवे असल्यास यापूर्वीच राज्य शासनाने तसे निर्देश दिले आहेत. आरोग्य सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.