श्रीरामपूर तहसील पुरवठा शाखेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह; ‘एजंटांची कामे झटपट, नागरिकांचे अर्ज मात्र प्रलंबित?’ 'मेरा रेशन'वर अर्ज करूनही सहा महिने नावांची प्रतीक्षा..

साईकिरण टाइम्स|राजेश बोरुडे 

श्रीरामपूर : शासनाच्या डिजिटल व्यवस्थेचा वापर करून नागरिकांनी स्वतःची कामे ऑनलाइन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी शासनाकडून सातत्याने आवाहन केले जाते. मात्र, नागरिकांनी ऑनलाइन अर्ज करूनही त्यावर महिनोन्महिने कार्यवाही होत नसेल तर या डिजिटल व्यवस्थेचा नेमका फायदा कोणाला? असा संतप्त सवाल श्रीरामपूरमध्ये उपस्थित झाला आहे. श्रीरामपूर येथील राजेश बोरुडे यांनी त्यांच्या कुटुंबातील दोन लहान बालकांची नावे रेशनकार्डमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्र शासनाच्या Mera Ration App वर दिनांक 3 मार्च 2026 रोजी ऑनलाइन अर्ज केला. आवश्यक कागदपत्रेही ऑनलाइन अपलोड करण्यात आली. मात्र, सहा महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही दोन्ही बालकांची नावे रेशनकार्डमध्ये समाविष्ट झालेली नाहीत.

राजेश बोरुडे यांनी दोन्ही ऑनलाइन अर्जांचे Request ID 2715513269 आणि 2715512950 असून, अँपवरील नोंदीमध्ये अर्ज राज्यस्तरावर पाठविल्याचे व तो प्रलंबित असल्याचे दर्शविले जात आहे. ‘ऑनलाइन अर्ज केला, तरी मंजुरी कुठे अडकली?’ एकीकडे शासन नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने सेवा घेण्यास प्रोत्साहन देत असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात अर्जांची कार्यवाही किती वेगाने होते, हा प्रश्न या प्रकरणामुळे ऐरणीवर आला आहे. अर्ज नेमका कोणत्या टेबलवर अडकला? कोणत्या अधिकाऱ्याने त्यावर कार्यवाही केली? विलंबाचे कारण काय? या प्रश्नांची उत्तरे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पुरवठा अधिकाऱ्यांनी द्यावी असेही राजेश बोरुडे यांनी म्हंटले आहे.

एजंटांची कामे तत्पर, नागरिकांची कामे प्रलंबित?’

श्रीरामपूर तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेच्या कामकाजाबाबत बोरुडे यांनी आपल्या तक्रारीत गंभीर आरोप व संशय व्यक्त केला आहे. सेतू केंद्र अथवा एजंटमार्फत आलेल्या कामांवर तुलनेने जलद कार्यवाही होते, तर नागरिकांनी स्वतः ऑनलाइन केलेली कामे प्रलंबित ठेवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “सामान्य नागरिकाने स्वतः ऑनलाइन अर्ज केला तर त्याला महिनोन्महिने प्रतीक्षा आणि एजंटामार्फत आलेल्या कामांना प्राधान्य का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

लाचखोरीच्या चर्चेची चौकशी करण्याची मागणी...

पुरवठा शाखेतील काही कामांसाठी एजंट किंवा मध्यस्थांची भूमिका वाढल्याच्या नागरिकांमधील चर्चेचीही निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. एजंट किंवा मध्यस्थामार्फत येणाऱ्या प्रकरणांना अनधिकृत आर्थिक देवाणघेवाणीमुळे प्राधान्य दिले जाते का, याची चौकशी करण्याची मागणी बोरुडे यांनी केली आहे. या आरोपांची सत्यता संबंधित विभागाच्या चौकशीतूनच स्पष्ट होणार आहे.

ऑनलाइन अर्जांच्या ‘ॲक्शन हिस्ट्री’चे ऑडिट करा


राजेश बोरुडे यांनी आपल्या तक्रारीत केवळ स्वतःच्या प्रकरणाची कार्यवाही करण्याची मागणी न करता श्रीरामपूर पुरवठा शाखेतील ऑनलाइन अर्जांची कार्यवाही तपासण्याची मागणी केली आहे. विशेषतः नागरिकांनी स्वतः केलेले ऑनलाइन अर्ज आणि सेतू/एजंटमार्फत आलेले अर्ज यांची तारीखवार कार्यवाही, मंजुरीचा कालावधी आणि प्रलंबित प्रकरणांची संख्या तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी

सामान्य नागरिकाला शासकीय सेवा मिळविण्यासाठी मध्यस्थाची गरज भासू नये, ऑनलाइन प्रणालीवर दाखल झालेल्या अर्जांवर पारदर्शकपणे आणि वेळेत कार्यवाही व्हावी, तसेच कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरप्रकार होत असल्यास त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाकडे जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन श्रीरामपूर तहसील पुरवठा शाखेच्या कामकाजाची चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदार राजेश अरविंद बोरुडे यांनी केली आहे.

'साईकिरण टाइम्स'चा थेट सवाल
शासन नागरिकांना ‘ऑनलाइन व्हा’ म्हणतेय; मग नागरिकांनी ऑनलाइन केलेले अर्ज महिनोन्महिने प्रलंबित का?
जर एजंटमार्फत आलेली कामे आधी होत असतील, तर या व्यवस्थेचे ऑडिट कोण करणार?

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post