शुभेच्छांची हौस असेल तर स्वतःच्या घरावर फ्लेक्स लावा; श्रीरामपूरच्या चौकांचा बाजार मांडू नका! ‘फ्लेक्समुक्त श्रीरामपूर’ अभियान तातडीने राबवा : राजेश बोरुडे यांचे पालिका प्रशासनाला निवेदन




श्रीरामपूर : वाढदिवस, राजकीय शुभेच्छा, पदभार, निवड, सत्कार, जयंती-पुण्यतिथी आणि विविध कार्यक्रमांच्या नावाखाली श्रीरामपूर शहरातील चौक, रस्ते, झाडे, वीजखांब व सार्वजनिक मालमत्तेवर अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनर लावून शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘फ्लेक्समुक्त श्रीरामपूर’ अभियान तातडीने राबविण्यात यावे, अशी आक्रमक मागणी राजेश बोरुडे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अहिल्यानगर शहरात १ डिसेंबरपासून फ्लेक्समुक्त अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त समोर आले असून, अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे आणि फ्लेक्स हटविण्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्याची भूमिका प्रशासनाने घेतल्याचे सांगण्यात येत आहे. अहिल्यानगर शहरात फ्लेक्सविरोधात कठोर भूमिका घेतली जात असताना श्रीरामपूर नगरपरिषद प्रशासनानेही आता बघ्याची भूमिका सोडून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी बोरुडे यांनी केली आहे.

शहरातील प्रमुख चौक, रस्ते, वाहतूक बेटे, वीज व दूरध्वनीचे खांब, झाडे, शासकीय इमारती, सार्वजनिक भिंती आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी परवानगीशिवाय लावण्यात येणारे फ्लेक्स व बॅनर शहराच्या सौंदर्याला बाधा आणत आहेत. अनेक ठिकाणी हे फ्लेक्स वाहतुकीस अडथळा निर्माण करतात, वाहनचालकांचे लक्ष विचलित करतात, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतात आणि शहराच्या स्वच्छतेला हरताळ फासतात. शुभेच्छा आणि प्रसिद्धीच्या नावाखाली सार्वजनिक जागांवर कब्जा करण्याची ही प्रवृत्ती थांबविण्याची वेळ आता आली असल्याचे बोरुडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

ज्यांना वाढदिवस, निवड, पदभार किंवा राजकीय अभिनंदनाच्या फ्लेक्सची एवढीच हौस असेल, त्यांनी खुशाल स्वतःच्या घरावर किंवा स्वतःच्या खासगी जागेत फ्लेक्स लावून शुभेच्छा द्याव्यात; मात्र सार्वजनिक चौक, रस्ते, झाडे, खांब आणि शासकीय मालमत्तेवर शहराचे विद्रूपीकरण करण्याचा अधिकार कोणालाही नाही. स्वतःच्या शुभेच्छांची हौस स्वतःच्या जागेत पूर्ण करा, श्रीरामपूर शहराला फ्लेक्सचा बाजार बनवू नका,” अशी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका राजेश बोरुडे यांनी घेतली आहे

निवेदनात शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, पोस्टर आणि जाहिरात फलक तातडीने हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. फ्लेक्स लावणारे, लावण्यास सांगणारे, प्रायोजकत्व देणारे आणि संबंधित जबाबदार व्यक्ती यांची ओळख पटवून त्यांच्यावर कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करावी, फ्लेक्स हटविण्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करावा आणि वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि संवेदनशील परिसर फ्लेक्समुक्त ठेवण्यासाठी नगरपरिषदेचे विशेष पथक नियुक्त करावे. राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, मंडळे, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांना समान नियम लागू करावेत. कारवाई करताना कोणताही राजकीय दबाव अथवा भेदभाव स्वीकारू नये, तसेच फ्लेक्स लावण्यासंदर्भातील परवानगी, नियम, दंड आणि कारवाई याबाबत व्यापक जनजागृती करावी, असेही बोरुडे यांनी म्हटले आहे.

केवळ निवेदन घेऊन फाईल बंद न करता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कारवाई करा! फ्लेक्स हटविण्याची मोहीम, दंडवसुली आणि अभियानाच्या अंमलबजावणीबाबत नगरपरिषदेने वेळोवेळी सार्वजनिक माहिती प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

श्रीरामपूर शहर स्वच्छ, सुंदर, सुव्यवस्थित आणि विद्रूपीकरणमुक्त ठेवणे ही प्रशासनासह प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे ‘फ्लेक्समुक्त श्रीरामपूर’ अभियानाचा ठोस निर्णय घेऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणी राजेश बोरुडे यांनी मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांच्याकडे केली आहे.

अन्यथा अनधिकृत फ्लेक्स आणि सार्वजनिक मालमत्तेच्या विद्रूपीकरणाविरोधात वरिष्ठ प्रशासनाकडे तक्रार करून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही राजेश बोरुडे यांनी दिला आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, अहिल्यानगर तसेच उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर यांना माहिती व कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post