श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपालिकेतील पात्र अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) लागू करण्याबाबत नगरविकास विभागाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी रखडल्याचा मुद्दा आता जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर पोहोचला आहे. या प्रकरणी राजेश बोरुडे यांनी केलेल्या तक्रारीची जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांनी दखल घेत श्रीरामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
नगरविकास विभागाच्या दिनांक १० जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार श्रीरामपूर नगरपालिकेतील पात्र अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) लागू करण्याची मागणी राजेश बोरुडे यांनी केली होती. मात्र, संबंधित शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने त्यांनी दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडे सविस्तर तक्रार निवेदन सादर केले.
राजेश बोरुडे यांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका शाखेने श्रीरामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात तक्रारीतील मागण्यांच्या अनुषंगाने आपल्या स्तरावर नियमानुसार कार्यवाही करून संबंधित अर्जदारास परस्पर अवगत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, या प्रकरणात धोरणात्मक अडचण असल्यास स्पष्ट अभिप्राय नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संचालनालयाकडे मार्गदर्शन मागविण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
NPS लागू करण्यासाठी राजेश बोरुडे यांच्या प्रमुख मागण्या
राजेश बोरुडे यांनी आपल्या तक्रार निवेदनातून पात्र कर्मचाऱ्यांची NPS प्रणालीमध्ये नोंदणी करून PRAN क्रमांक उपलब्ध करून देणे, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून नियमानुसार १० टक्के अंशदान कपात करणे, नियोजकाचे १४ टक्के अंशदान जमा करणे, तसेच यापूर्वी जमा झालेल्या अंशदानाच्या रकमेबाबत नियमानुसार कार्यवाही करणे, अशा महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत.
शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे पात्र कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीविषयक आर्थिक हितावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे राजेश बोरुडे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने या प्रकरणात विलंब न करता ठोस कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे निर्देश; आता नगरपालिकेच्या कार्यवाहीकडे लक्ष
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मुख्याधिकाऱ्यांना निर्देश प्राप्त झाल्यानंतर श्रीरामपूर नगरपालिका प्रशासन शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती पावले उचलते, पात्र कर्मचाऱ्यांची NPS नोंदणी व अंशदान जमा करण्याची प्रक्रिया कधी पूर्ण करते, याकडे आता संबंधित अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
राजेश बोरुडे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे श्रीरामपूर नगरपालिकेतील NPS अंमलबजावणीचा विषय प्रशासकीय पातळीवर ऐरणीवर आला असून, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानंतर नगरपालिका प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होणार का, याकडे श्रीरामपूरकरांचेही लक्ष लागले आहे.
