संगमनेर - आज मुली व आई यांचा सुसंवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे मुलींच्या आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. भविष्यात सुदृढ अपत्य जन्माला येण्यासाठी किशोर वयापासून मुलींचा आहार व आरोग्य याची काळजी घ्यायला हवी असे प्रतिपादन नुकतेच संगमनेर येथील प्रतिथयश डॉ. एकता जगदीश वाबळे यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील श्री. मनोहर बाबा विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या उपस्थित होत्या.
यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक संदीप सातपुते, कामगार पोलिस पाटील सौ. संगिता बो-हाडे, अँड सुषमा काळे, श्रीमती सिंधूताई खतोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ एकता वाबळे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या की, घरी मुली मोबाईल वापरतांना काय पाहतात? कुणाशी चॅटींग करतात? तिच्या मैत्रिणी कोण आहेत? याकडे पालकांचे बारीक लक्ष हवे आहे. काही घडले तर केवळ शाळा किंवा महाविद्यालयाला दोष देऊन उपयोग नाही. पालकांनी त्यांना उत्तम संस्कार दिले पाहिजे. मुलींनी आपल्या अडी अडचणी पालकांशी बोलून दाखविली पाहिजे.
यावेळी कुमारी ऐश्वर्या शिंदे हिने विद्यालयाचे उपक्रम उपस्थितांसमोर इंग्रजीतून सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सुषमा काळे यांनी, सुत्रसंचालन श्रीमती अनिता डांगे तर आभार श्रीमती सविता खर्डे यांनी मानले. सदर कार्यक्रमास माता पालक व मोठ्या गटातील विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.