श्रीरामपूर : राजस्थानी मारवाडी समाजातील विधवा, विधूर, अपंग व घटस्फोटीतांचा पुन:विवाह करू इच्छिणार्यांचा राज्यस्तरीय परिचय संमेलनाचे आयोजन दि. २५ ऑगस्ट रोजी जैन भवन संकलेचा नगर, जालना येथे करण्यात आले असल्याची माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जैन संघटनेचे माजी राज्याध्यक्ष हस्तीमल बंब यांनी दिली. यावेळी त्यांचे सहकारी प्रकाश कोचर उपस्थित होते.
श्रीरामपूर येथे संभवनाथ जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शैलेशभाई बाबरीया, माहेश्वरी समाजाचे पुरूषोत्तम उर्फ मुन्ना झंवर, ऍड. सुभाष बिहाणी, दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष संजय कासलीवाल, माजी अध्यक्ष अनिल पांडे, स्थानकवासी जैन संघ विश्वस्त कल्याणमल कुंकुलोळ, भाग्येश चोरडीया, भगवान कुंकुलोळ, ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी, डॉ. मनोज छाजेड, गणेश पोखरणा, अशोक भट्टड, अनिल मालपाणी, राधेश्याम बुब, राजेंद्र भंडारी, विनय भंडारी, अशोक उपाध्ये, सुरेश कोठारी, सुनील कासलीवाल आदींच्या उपस्थितीत बोरावके नगर मध्ये भगवान कुंकुलोळ यांच्या निवासस्थानी सकल राजस्थानी मारवाडी समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी हस्तीमल बंब यांनी माहिती दिली. विधवा, विधूर, घटस्फोटीत विवाह करू इच्छुकांचे पालकांनी १५ ऑगस्टपर्यंत श्रीरामपूर येथे हस्तीमलजी बंब, मोबा. व व्हॅटस्ऍप नंबर ९४२२२१९०६८ वर प्रवेश अर्ज पाठवावे फी १ हजार रुपये भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जैन मारवाडी राजस्थानी वरील प्रमुखांकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हस्तीमलजी बंब यावेळी म्हणाले की, समाजासाठी अनेकांनी कामे आजपर्यंत केली आहेत. त्यामध्ये विधवा, विधूर व अपंग विवाह करणारे इच्छुकांचे प्रश्नाकडे सर्वत्र दुर्लक्ष झाले. शिक्षणात प्रगतीच्या काळात अनेक वधू-वरांना अपघातामुळे, आजारपणामुळे व कौटुंबिक कारणामुळे विधवा, विधूर होण्याचे प्रापंचिक समस्येचा सामना करावा लागतो. विखुरलेल्या कुटुंबाना परत जोडण्याचा हा प्रयत्न असून मारवाडी समाजातील वेगवेगळ्या पंथातील लोकांना एकाच मंचावर आणून संघटीत करण्याचा हा राज्यस्तरी प्रयत्न आहे. परिचय संमेलनात सहभागी झालेल्या विधवा, विधूर, अपंग विवाह करु इच्छिणार्यांची पुस्तिका माहितीसाठी प्रकाशित करण्यात येणार आहे.
अनिल पांडे व पुरूषोत्तम झंवर म्हणाले की, राजस्थानी समाजात विवाह जुळण्याच्या मोठ्या समस्या आहेत. हस्तीमलजी बंब यांनी विधवा, विधूरांसाठी मोठे कार्य हाती घेतले आहे. त्यास समाजाने पुढे येवून सहकार्य केले पाहिजे. श्रीरामपूर परिसरातून आम्ही सहकार्य करू, असे आश्वासन दिले. दीपक संघवी यांनी आभार मानले. रमेश कोठारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भगवान कुंकुलोळ परिवाराने हस्तीमल बंब यांचा सत्कार केला.