श्रीरामपूर | मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीसाठी सरसावली नगरपालिकेची यंत्रणा


श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) : राज्यभरातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यभरात सुरू असून त्यासाठीचे फॉर्म भरून घेण्याचे काम सर्वत्र सुरू आहे. श्रीरामपूर शहरात देखील नगरपालिकेने यासाठी जोरदार तयारी केली असून मेन रोडवरील लोकमान्य टिळक वाचनालयातील आगाशे सभागृह येथे तसेच शहरातील सर्व नगरपालिका शाळा, संजय नगर भागातील मुळे शाळा व मिनी स्टेडियम मधील नगरपालिकेच्या उपकेंद्रात देखील या योजनेचे फॉर्म विनामूल्य भरून घेतले जात आहेत.

              आगाशे सभागृहामध्ये नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांत अधिकारी किरण सावंत पाटील व पालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या प्रमुख प्रशासकीय अधिकारी, वाचनालयाच्या ग्रंथपाल श्रीमती स्वाती पुरे यांच्या देखरेखीखाली त्यांची संपूर्ण टीम सदर योजनेचे फॉर्म भरणे कामी अग्रेसर आहे. यामध्ये स्वतः स्वाती पुरे,सिद्धार्थ गवारे,स्वप्निल माळवे, विजय झिंगारे, राजेश जेधे,दिशा बोरकर, साक्षी अहिरे, पूजा क्षत्रिय, राजेंद्र बोरकर हे सर्व काम करीत आहेत. 

महिला वर्गाचे फॉर्म भरून घेऊन जागेवरच अपलोड केले जात आहेत. त्यासाठी आगाशे सभागृहामध्ये वायफाय व राऊटर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.आत्तापर्यंत या केंद्रावर 750 पेक्षा जास्त फॉर्म भरून झाले आहेत.शहरातील इतर केंद्रातील सर्व फॉर्म येथे जमा केले जात आहेत तसेच नगरपालिकेचे बालवाडी विभागातील कर्मचारी देखील घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेत आहेत.खाजगी किंवा इतर ठिकाणी संगणकावर भरले जाणारे फॉर्म ची हार्ड कॉपी येथे जमा केली जात आहे. येणाऱ्या महिला भगिनींना अत्यंत चांगली सेवा येथे मिळत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी या केंद्रावरील कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत.

शहरामध्ये काही ठिकाणी पैसे घेऊन फॉर्म भरले जात आहेत त्यातही ओटीपी येत नसल्याने अनेकांना दोन दोन तास ताटकळत बसावे लागत आहे. त्यापेक्षा नगरपालिकेच्या आगाशे सभागृहातील केंद्रावर मोठी टीम कार्यरत असून येथे मोफत फॉर्म भरले जात आहेत तसेच वायफाय सुविधा उपलब्ध असल्याने ओटीपी वगैरे सुद्धा पटकन येत आहेत.तरी शहरातील मुख्यमंत्र्यांच्या लाडके बहिणींनी या ठिकाणी येऊन आपले फॉर्म भरावेत तसेच समवेत अर्जात नमूद केल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे आणावीत. जागेवर ती अपलोड केली जातात.या केंद्रावरील कर्मचारी स्वतः फॉर्म भरून घेत आहेत.तरी अद्याप भगिनींनी फॉर्म भरले नसतील त्यांनी ते त्वरित भरावेत. फॉर्म भरण्यासाठी येताना स्वतःचा मोबाईल सोबत आणावा असे आवाहन ग्रंथपाल स्वाती पुरे यांनी केले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post