शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांचे कामे सुरु आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून होत असलेले कामांचा दर्जा हा अतिशय सुमार आहे. कामात मोठी अनियमितता आहे. वलेशा पथ ते महाराज कंत्रोड यांच्या घरापर्यंतचा रस्ता, श्रीरामपूर न्यायालय परिसरातील रस्ता तांबे चाळ रोड या रस्त्यांची कामे ठेकेदार विक्रांत महाले यांनी अत्यंत निकृष्ट पद्धतीने केली आहेत. नगरपरिषदेच्या बांधकाम विभागातील अभियंता यांनी शासनाच्या निधीचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल करून घोटाळा केल्याचा आरोप फिरोजभाई पठाण यांनी केला आहे.
रस्ते बांधकामासाठी वापरण्यात आलेली खडी, डांबर यांची शासकीय प्रयोगशाळा व क्षेत्रीय प्रयोगशाळात तपासणी झालेली आहे का नाही? असा सवाल फिरोजभाई पठाण यांनी केला आहे. ही कामे अंदाजपत्रकाप्रमाणे होत नाही. काम पूर्ण करतांना निविदेतील शर्ती-अटींचा ठेकेदाराने भंग केला असून कामात डुप्लीकेट क्रुड ऑईल मिश्रीत डांबराचा वापर करुन मोजमाप पुस्तकात नोंद केल्याप्रमाणे काम न करता थातुर-मातुर स्वरुपात काम पूर्ण केलेले असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. चालु असलेल्या सर्व कामांची दक्षता व गुणनियंत्रण पथकाकडून चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी फिरोजभाई पठाण यांनी केली आहे.