अहमदनगर : नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाची मोठी दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनधारक व वाहनांचा अक्षरशः खुळखुळा होत आहे. शासन व लोकप्रतिनिधीच्या निष्क्रिय कारभारामुळे रस्त्याची दुर्दशा झाली असून, रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे, या मागणीसाठी दि. १९ ऑक्टोबर पासून राहाता येथील छ. शिवाजी महाराज चौकात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा 'छावा ब्रिगेड'चे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनी दिला आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते यांच्यासह प्रशासनाला निवेदन दिले असून त्यात म्हंटले आहे कि, नगर-मनमाड या रस्त्याची अतिशय दुर्दैवी अवस्था झाली आहे. या राष्ट्रीय महामार्गात शिर्डी सारखे जागतिक देवस्थान आहे. शिर्डी याठिकाणी अनेक राज्यातून साई भक्त येतात. जिल्ह्यातले अनेक लोक या रस्त्याने प्रवास करतात. नगर येथील पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे आहेत. पूर्वीही त्यांनी राजकीय मंत्री पदावर काम केले, पण एक पालक म्हणून त्या जिल्ह्यासाठी कमी पडले असल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे. अनेक लोकांचे प्राण या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गेले. शासकीय यंत्रणा ही दुर्लक्ष करत असून, रस्त्याचे काम होण्यासाठी उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.