श्रीरामपूर येथील प्रशासकीय भवनात केंद्रीय योजनांच्या जिल्ह्यातील प्रगतीचा आढावा केंद्रीय राज्यमंत्र्यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राहूल आहेर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ.पकंज जावळे व सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण/शहरी), प्रधानमंत्री शेतकरी सन्मान, उज्ज्वला गॅस योजना , मातृवंदना, स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ सर्वेक्षण, पीएम स्वनिधी, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मृदा आरोग्य कार्ड, केंद्रीय कृषी अन्नप्रक्रिया योजना, आयुष्यमान भारत योजना आदी केंद्रीय योजनांचा केंद्रीय राज्यमंत्र्यांनी व महसूलमंत्र्यांनी संयुक्त आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
केंद्रीय राज्यमंत्री श्री.पटेल म्हणाले, केंद्राच्या योजनांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे कल्याणाचे काम होत आहे. या योजनांच्या अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनाचा नियमित वापर करावा. योजनाच्या प्रचार-प्रसाराचे काम करावे. जलजीवन मिशनमध्ये अहमदनगर जिल्ह्याने उत्कृष्ट काम केले आहे. असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
योजनांची अंमलबजावणी करतांना लोकांच्या अडचणी व अभिप्राय समजून घ्यावेत. पंतप्रधान स्वनिधी योजनेतून हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायासठी आर्थिक मदत झाली आहे. असेही श्री.पटेल यांनी सांगितले.
लोकाभिमुख काम केल्यास शासन अधिकाऱ्यांच्या पाठीशी - महसूलमंत्री
राज्याच्या योजना तर महत्त्वपूर्ण आहेतच मात्र केंद्राच्या योजना ह्या तळागाळातील लोकांचे जीवनमान बदलणाऱ्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी साठी अधिकाऱ्यांनी एकदिलाने काम करावे. शासनाच्या या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना पोहचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख काम केल्यास शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल. अशा शब्दांत राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना आश्वसत केले.
राज्याची महात्मा फुले जन आरोग्य व केंद्राची आयुष्यमान भारत योजना आरोग्य विभागाच्या महत्त्वपूर्ण योजना आहेत. या दोन्ही योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात येऊन अपेक्षित लाभार्थी उद्दिष्ट साध्य करावे. असेही महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केंद्राच्या योजनांच्या जिल्ह्यातील प्रगती अहवालाचे सादरीकरण केले.