श्रीरामपूर 'आरटीओ'त दुचाकी वाहनांसाठी नवीन पसंती क्रमांक मालिका


शौकतभाई शेख

श्रीरामपूर : येथील उपप्रादेशिक परिवहन ( RTO ) कार्यालयात परिवहनेतर (खाजगी) संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी एम.एच.१७ सी.यु. ही नवीन पसंती क्रमांक मालिका सुरू करण्यात आली आहे. वाहनांचे आकर्षक नोंदणी क्रमांक शासनाने राखून ठेवले असून या क्रमांकासाठी शासनाकडून ठराविक शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मीला पवार यांनी दिली.

आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक मिळण्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज व त्या क्रमांकासाठी विहित केलेल्या शासकीय शुल्काचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्रीरामपूर यांचे नावे दि.२९ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०:३० ते ४:३० वाजे दरम्यान श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (हरेगांव फाटा,नेवासा रोड,शिरसगांव) नवीन वाहन नोंदणी विभाग (खिडकी क्र. १५) येथे जमा करावा लागेल. अर्जासोबत अर्जदाराच्या पत्त्याच्या पुराव्याची व फोटो ओळखपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी. एकदा राखून ठेवलेला पसंती क्रमांक कोणत्याही परिस्थितीत दुसर्‍या व्यक्ती अथवा संस्थेच्या नावे हस्तांतरीत होणार नाही, तसेच रद्द करता येणार नाही.

दुचाकी वाहनांचा विशिष्ट आकर्षक क्रमांक आरक्षित करण्यासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास अशा क्रमांकाची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर दि. २९ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजता प्रदर्शित करण्यात येईल. तसेच सदरच्या आकर्षक क्रमांकासाठी लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी दि.३० सप्टेबर २०२२ रोजी दुपारी ४ वा. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे दालनात हजर रहावे लागेल असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांच्याकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post