वर्ल्ड ट्रेंड सेंटर येथे आयोजित राज्यस्तरीय उद्योग परिषदेत केंद्रीय मंत्री श्री. राणे बोलत होते. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अनबलगन यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि उद्योजक उपस्थित होते.
देशाच्या विकासात सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचे बहुमोल योगदान आहे. शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र असून उद्योगाला पूरक असे धोरण केंद्र सरकार राबवित आहे. उद्योग क्षेत्राच्या विविध प्रस्ताव व समस्यांसंबंधी ‘महाराष्ट्र चेंबर’ च्या पदाधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक आयोजित करू. महाराष्ट्रात नवीन गुंतवणूक व आधुनिक तंत्रज्ञान येण्यासाठी महाराष्ट्र चेंबरने ऑगस्ट महिन्यात अमेरिकेत बिझनेस कॉन्फरन्स आयोजित केली ही बाब कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात मुंबई येथे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय ट्रेड एक्सपो’ आयोजित केला आहे. यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असेही केंद्रीय मंत्री श्री. राणे यांनी यावेळी सांगितले.
राज्यात मोठी गुंतवणूक व रोजगार उपलब्ध करणारे उद्योग आणणार - उद्योगमंत्री उदय सामंत
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, मोठी गुंतवणूक वा मोठा रोजगार उपलब्ध करणारे उद्योग राज्यात आणणार असून महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात भविष्यात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी नवीन उद्योजकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. मोठे उद्योग महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. संस्थेच्यावतीने ज्याप्रमाणे जिल्ह्यात जाऊन उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो, त्याप्रमाणे शासनही उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्न करेल. संस्थेच्या उपक्रमासाठी शासनाकडून मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल. राज्यामध्ये उद्योग आणि रोजगार वाढवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी प्रास्ताविक केले. विविध उद्योगात प्रगती करणाऱ्या उद्योजकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या विविध उपक्रमाचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.