वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत जीएसटी चुकवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल


मुंबई, दि. 16 : वस्तू व सेवा कर विभागाच्यावतीने विशेष मोहीम कारवाई अंतर्गत खोटी देयके सादर करणाऱ्या विविध सहा कंपन्यांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वस्तू व सेवा कर विभागाने दिली आहे.

बनावट पावत्यांमध्ये सहभागी असलेल्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून बालाजी स्टील कंपनीची चौकशी करण्यात आली.  तसेच बालाजी स्टील, द्वारकेश ट्रेडर, एस.के.एन्टरप्रायजेस, परमार एन्टरप्रायजेस, अलंकार ट्रेडींग, शुभ ट्रेडर या सहा कंपन्यांच्या विविध शाखांवरही तपास करण्यात आला आहे.  यामध्ये बालाजी स्टील कंपनीमध्ये 11.55 कोटीची बनावट देयके तसेच इतर पाच कंपन्यामध्ये 75.71 कोटीची बनावट देयके आढळली आहेत.

या प्रकरणात भंवरलाल गेहलोत, वय – 45 वर्षे, याला अटक होऊन 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.  2022 – 23 मधील या 41व्या अटकेसह, महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने पुन्हा एकदा करचोरी करणाऱ्यांना आणि बनावट पावत्या जारी करणाऱ्या आणि बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा आणि पासिंग करणाऱ्या व्यक्तींना कठोर इशारा दिला आहे.

राज्य कर, अन्वेषण-बी चे सहआयुक्त वनमथी सी. मुंबई आणि राज्य कर उपायुक्त मनाली पोहोरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य कर विभागाचे सहाय्यक आयुक्त महेंद्र पवार, प्रसाद आडके, सायली धोंडगे आणि दिनेश भास्कर यांच्यासह राज्य कर निरीक्षक आणि कर सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post