साईकिरण टाइम्स | २१ जानेवारी २०२१
श्रीरामपूर (प्रतिनिधी) नुकत्याच पार पडलेल्या तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणेने उत्कृष्टपणे नियोजन केल्यामुळे ही निवडणूक प्रशासकीय पातळीवर निर्विघ्नपणे पार पडली. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने खूपच चांगले नियोजन केल्यामुळे कोणत्याही कर्मचार्याला त्रास झाला नाही. विशेषत: महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार नियुक्त्या दिल्या तसेच गरजू कर्मचार्यांच्या नियुक्त्या रद्द देखील केल्या. याबद्दल तालुक्यातील सर्व महिला शिक्षकांनी व इतर खात्यातील महिला कर्मचाऱ्यांनीही तहसीलदारांना धन्यवाद दिले आहेत.
ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होताच महिला कर्मचाऱ्यांना तसेच प्राथमिक शिक्षकांना गैरसोयीच्या नेमणुका मिळाल्या होत्या .याबाबत शिक्षक संघटनांनी तहसीलदारांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले. तहसिलदारांनी संघटनेच्या विनंतीला मान देऊन आवश्यक ते बदल निवडणूक यंत्रणेत केले. तालुक्यातील शिक्षकांच्या सहकार्याने आवश्यक तेथे नियुक्त्या बदलून दिल्या. त्याचबरोबर महिला कर्मचाऱ्यांना ते राहात असलेल्या घरापासून जवळच्या ठिकाणी सोयीच्या नियुक्त्या देण्यात आल्या. याकामी महिला कर्मचाऱ्यांशी निवडणूक यंत्रणेने व्यक्तिशः संपर्क केला.महाराष्ट्रात हे पहिल्यांदा घडले.इतर तालुक्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना गैरसोयीच्या नियुक्त्या दिल्या गेल्या. मात्र श्रीरामपूर तालुक्यात प्रत्येक महिला कर्मचाऱ्यांची सोय करण्यात आली .ज्या गावातून निवडणुक कामाबद्दल आक्षेप येण्याची शक्यता होती, त्या ठिकाणी तातडीने बदल करण्यात आले. विविध राजकीय पक्षांचे नेते, प्रमुख यांना देखील विश्वासात घेऊन निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न पार पाडण्यात आली. *निवडणूक यंत्रणेला तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष व पढेगाव केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख शकील बागवान यांची मोलाची मदत झाली. निवडणूक शाखेचे नायब तहसीलदारअशोक उगले, दिपक गोवर्धने, त्यांचे सहाय्यक संदीप पाळंदे,जितेंद्र भगत, पुरुषोत्तम चौधरी, श्रीधर बेलसरे, अवधूत कुलकर्णी, असलम शेख यांनी सुद्धा तहसीलदारांच्या आदेशाचे पालन करीत निवडणूक कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त सवलतीच्या नेमणुका कशा उपलब्ध होतील व निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे शांततेत कशी पार पडेल यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. तहसीलदार पाटील यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सर्व निवडणुका विनातक्रार,सुरळीत पार पडल्या.प्रशासनाने मनावर घेतले तर शासकीय कामकाज सुद्धा सर्वांना विश्वासात घेऊन व सर्वांच्या सहकार्याने उत्कृष्टपणे पार पाडले जाऊ शकते याचे उत्तम उदाहरण तहसीलदार प्रशांत पाटील यांनी राज्यासमोर घालून दिले. तहसील प्रशासनाच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळातर्फे शिक्षक बँकेचे संचालक सलीमखान पठाण, गुरुमाऊली मंडळाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे, तालुका संघाचे अध्यक्ष शकील बागवान, गुरुमाऊली मंडळाचे तालुका अध्यक्ष संतोष वाघमोडे, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष सरदार पटेल, महिला आघाडीच्या अध्यक्षा शोभा शेंडगे,जिल्हा संघटक बेनहर वैरागर,राघोजी पटारे, श्याम पटारे, नगरपालिका संघाचे राजू गायकवाड, शिवाजी भालेराव, गुरुमाऊली महिला आघाडीच्या अध्यक्षा मिनाज शेख आदींसह संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलदार प्रशांत पाटील व त्यांच्या सर्व टीमचे विशेष अभिनंदन केले आहे.
मानधन देण्याची मागणी...
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काम करणाऱ्या मतदान अधिकारी क्रमांक 1,2,3 तसेच पोलिस कर्मचारी, शिपाई यांना राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये निवडणूक कामाचे मानधन देण्यात आलेले आहे. नगर जिल्ह्यात मात्र हे मानधन देण्यात आलेले नाही. राज्य सरकारचा नियम जर सर्वांसाठी सारखाच आहे तर जिल्ह्यातील कर्मचारी मानधनापासून वंचित का ? असा प्रश्न उपस्थित करून जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कार्य करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना इतर जिल्ह्याप्रमाणे त्वरित मानधन देण्यात यावे,अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.