साईकिरण टाइम्स | १२ जानेवारी २०२१
बेलापूर | प्रतिनिधी | बारा महिने फक्त राजकारणच करायचे. गावाच्या विकासाच्या कामात खोडा घालायचा. गावात कोणतेही काम असो, रस्त्यावर साधा मुरूम टाकायचा असो, त्याला आडवे पडायचे. काम होऊ द्यायचे नाही. वरून, मलिदा खाल्ला! विकास झाला नाही! असा गळा काढून, साप साप म्हणून भुई धोपटण्याचे काम विरोधक करत असल्याची घणाघाती समाचार बेलापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना जनता विकास आघाडीचे नेते सुधीर नवले यांनी घेतला आहे.
प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ते पुढे म्हणाले की, दहा वर्षापासून विरोधक गावाच्या सत्तेतून दूर असल्यानेच त्यांचा तिळपापड होत आहे. जनतेला हे पूर्णपणे समजलेले आहे. याहीवेळी ते भुईसपाट होतील! मायबाप मतदार यांना यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. गेल्या दहा वर्षात चालत्या कामात खोडा घालण्यापलिकडे वेगळे काही यांनी केले नाही.
राष्ट्रीय सण असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहनातही खुणसीचे राजकारण आणण्याचे पाप यांनी केले आहे, हेही जनता विसरलेली नाही. यांना गावाच्या विकासाचे काही घेणे देणे उरले नाही.
आमच्या उचापत्या करण्यापेक्षा यांनी दहा वर्षात, झेडपीच्या माध्यमातून गावात काय दिवे लावाले ते जनतेला सांगावे ? यांच्या फसव्या हसण्याचा आणि गोड बोलण्याचा फुगा आता फुटला आहे. हा हू करून भुलवण्याचा जमाना आता राहिला नाही! जनता सुज्ञ झाली आहे. जे काम करतात त्यांच्या पाठीशी ती आता ठामपणे उभे राहणार आहे किंबहुना राहत आहे. आम्ही काय केले ते जनतेसमोर आहे. यांच्याकडे सांगण्या-दाखवण्यासाठी काही राहिले नाही. त्यापासून जनतेला विचलित करण्यासाठीच मलिदा खाल्ल्याच्या वावड्या उठविण्याचा प्रयत्न करत आहेत. असे जनता विकास आघाडीच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सुधीर नवले यांनी विरोधकांना ठणकावले आहे.