साईकिरण टाइम्स | ११ जानेवारी २०२१
श्रीरामपूर | शासकीय हमी भावानेच तूर खरेदी व्हावी म्हणून ग्रीनपॅक फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, माळवडगाव मार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
शासनाने ६ हजार रुपये हमी भाव जाहीर केला आहे. तथापि, व्यापारी हमीभावाने तूर खरेदी करीत असल्याने शासकीय तूर खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत होते. आमदार लहू कानडे यांनी ग्रीनपॅक फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, माळवडगाव व त्यांच्या फेडरेशन मार्फत नाफेडची मान्यता प्राप्त करून शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्यास मदत केली. ग्रीनपॅक फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, माळवडगावचे अध्यक्ष श्री. प्रमोद आसने यांनी नुकतेच खरेदी केंद्र सुरू झाल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून मार्केटयार्ड समोर श्रीकृष्ण हार्डवेअर शेजारील गाळा न. ७१ मध्ये तूर विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्याना नाव नोंदवता येईल. तसेच बेलापुर रोड येथील यशोधन या आमदार कार्यालयामध्येही तूरविक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची नाव नोंदणी करून घेण्याची सोय आमदार लहू कानडे यांनी उपलब्ध करून दिली आहे. नाव नोंदणीसाठी तूर पेरीची नोंद, ७/१२ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स आवश्यक आहे. ग्रीनपॅक फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, माळवडगाव या दोन्ही ठिकाणच्या केंद्रावरील नोंदणीची कागदपत्रे प्राप्त करून शेतकऱ्यांची विनामूल्य नाव नोंदणी ऑनलाईन करतील. त्यानंतर शेतकऱ्याला मेसेज प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्षात तूर माळवडगाव खरेदी केंद्रांवर घेऊन जाता येईल.
प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांच्या उच्च शिक्षित तरूणांना प्रोत्साहन देऊन फार्मर्स प्रोड्यूसर कंपन्या स्थापन करण्याची मोहीम आमदार कानडे यांनी हाती घेतली आहे. याच तरुण उद्योजकामार्फत शेतकऱ्याना याचे लाभ दिले जात आहेत व या मतदारसंघामधे एक नवी संस्कृती होत आहे. असे आवर्जून आमदार लहू कानडे यांनी मत व्यक्त केले.
मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यानी या शासकीय तूर खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार लहू कानडे आणि ग्रीनपॅक फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष प्रमोद आसने यांनी केले आहे.