
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीत झालेल्या वाताहतीनंतर खडबडून जागे झालेल्या भारतीय क्रिकेट संघाने मेलबोर्नला सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीत आपल्या कुवतीपेक्षा सरस कामगिरी करत मायदेशात बलाढय असलेल्या ऑस्ट्रेलियाला पहिल्या दोन दिवसांच्या खेळात खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात जोरदार कामगिरी करत पिछाडीवर टाकले.
नियमित कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीतील दारूण पराभवानंतर संघाला वाऱ्यावर सोडून देशहितापेक्षा कुटुंब हिताला महत्व देऊन मायदेशी परतला. परंतु दौऱ्यावरील संघ प्रबंधनाने उपलब्ध खेळाडूंचा सर्वोत्तम संघ निवडून हंगामी कर्णधार अजिंक्य राहाणेच्या नेतृत्वाखाली बॉक्सिंग डे कसोटीला सामोरे गेला. मागील काही दिवसांपासून अजिंक्य राहाणे एक फलंदाज म्हणून अपयशी ठरत होता. त्यामुळे त्याच्या कुवतीविषयी शंका घेतल्या जात होत्या. शिवाय परदेशात तो प्रथमच भारताचे नेतृत्व करत असल्याने त्याच्या नेतृत्व क्षमतेविषयी बरेच जण सांशंक होते.
याच पार्श्वभूमिवर सुरू झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या सुरुवातीलाच राहाणे कर्णधार म्हणून नाणेफेक हरला. परंतु त्यानंतर पहिल्या दिवसअखेर आपल्या नेतृत्वगुणांच्या जोरावर त्याने प्रथम ऑस्ट्रेलियाचा डाव झटपट गुंडाळला व पहिल्या कसोटीतील ३६ धावांत सर्वबाद झालेल्या भारतीय फलंदाजीला मायेचा व मोलाचा आधार देत सहकारी फलंदाजांचे मनोबल उंचावत स्वतःही एका कुशल नेत्यासारखा आघाडीवर राहून लढला. नुसता लढलाच नाही तर स्वतःच्या नावाप्रमाणे एक झुंजार शतक ठोकून दिवसअखेर अजिंक्य राहीला.
सामन्याच्या पहिल्या दिवशी आपल्या गोलंदाजांत जोश भरून क्षेत्ररक्षकांडून सर्वोत्तम कामगिरी करून घेत अजिंक्य राहाणेने आपल्यातील उत्तम कर्णधार साबीत केला. तर दुसऱ्या दिवशी संघाची गरज ओळखून मिळेल त्या सोबत्याला बरोबर घेऊन संघाच्या डावाला आकार दिला. त्याचबरोबर स्वतःनेही ऑस्ट्रेलियाच्या घातक माऱ्याला निर्धाराने सामोरे जात आपले राष्ट्र कर्तव्य इमानेइतबारे पार पाडले.
अनुभवी के.एल राहुलला डावलून संधी दिलेल्या अष्टपैलू रविंद्र जडेजासह नाबाद शतकी भागीदारी करून भारताला भक्कम आघाडी मिळवून देत राहाणेने ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीबरोबरच बदलत्या हवामान व वातावरणाचाही संयमाने सामना करत भारतीयसंघाला दुसऱ्या अखेर प्रतिस्पर्धा पेक्षा टॉपला नेऊन ठेवले आहे.
भारताकडून सलामीवीर मयंक अग्रवाल शिवाय प्रत्येक फलंदाजाने आपआपल्या परिने योगदान देण्याचा प्रयत्न केला. भारत पहिल्या दिवसअखेर कांगारूंपेक्षा ८२ धावांनी आघाडीवर असला तरी भरवशाचा चेतेश्वर पुजारा अपेक्षेनुरूप खेळ करू न शकल्याने भारताला एक वेळ संकटाचा सामना करावा लागला. हनुमान विहारी, रिषभ पंत चांगली सुरुवात मिळूनही त्याचा योग्य लाभ घेऊ न शकल्याने भारताचा डाव अडचणीत आला होता. परंतु कर्णधार राहणे व रविंद्र जडेजाने केलेला जबाबदारी पूर्ण खेळ भारताला भक्कम स्थितीत घेऊन गेला.
तत्पूर्वी पहिल्या कसोटीत निराशजनक खेळ करणाऱ्या पृथ्वी शॉ ऐवजी संधी मिळालेल्या सलामीवीर शुभमन गिलने केलेल्या ४५ धावांच्या मजबूत खेळीने संघाला आधार दिला होता. आता राहिलेल्या तीन दिवसांच्या खेळात भारताने आपल्या खेळाचा आलेख असाच राखला तर कांगारूंना बॉक्सिंग डे कसोटीत सहज मात देता येईल. पहिल्या कसोटीतही भारत पहिले दोन दिवस आघाडीवर होता परंतु तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली होती. तशी परिस्थिती पुन्हा उदभवू नये एवढीच अपेक्षा भारतीय फलंदाजांकडून आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com