साईकिरण टाइम्स ब्युरो, 27 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | धुळे येथे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना विविध शैक्षणिक प्रश्नांसंदर्भातील मागण्याचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीचा निषेध करून, विविध शैक्षणिक मागण्यांचे निवेदन अभाविपच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना गुरुवारी (दि.27) देण्यात आले. मंत्री अब्दुल सत्तार व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन देण्यासाठी वेळ मागितला होता; परंतु विद्यार्थी हिताच्या ज्या मागण्या होत्या, त्याकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांवर त्यांच्या विना वर्दीतील पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचा निषेध म्हणून गुरुवारी (दि.27) श्रीरामपूर येथे प्रांताधिकाऱ्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कायद्याचे उल्लंघन न करता सोशल डिस्टेंसिंगचे पालन करून दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, चालु वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात ३०% कपात करावी, चुकीच्या लागलेल्या निकालांचे पुनर्मूल्यांकन करावे, अशा विविध मागण्या करत विदयार्थ्यांनवर झालेल्या मारहाणीची योग्य चौकशी करावी. मंत्री अब्दुल सत्तार आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा, असे म्हंटले आहे. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे हंसराज बतरा, सिद्धार्थ गिरमे, श्रेयस झिरंगे, शिवराज रसाळ,ऋषिकेश खाटीक पाटील, संकेत अनारसे, आनंद बुधेकर,जयराम खटाने उपस्थित होते.