साईकिरण टाइम्स ब्युरो, 11 जून 2020
श्रीरामपूर | पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर येथील दलित तरुण विराज जगताप याची प्रेम प्रकरणातून हत्या केल्याप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशा मागणीचे निवेदन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक संभाजी पाटील यांना भीमशक्ती संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
यावेळी मगर म्हणाले की, पिंपळे सौदागर येथे तरुणीवर प्रेम केल्याच्या रागातून मुलीच्या घरच्यांकडून दलित तरुण विराज जगताप याची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. यावेळी मारहाण करत असताना 'तुझी लायकी आहे का आमच्या मुलीवर प्रेम करायची' असे म्हणत अंगावर थुकले व जातीवाचक शिवीगाळ केली. त्याचा निर्घुणपणे खून करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र मध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळेआरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी. कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी. तसेच आरोपीला फाशी लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी मगर यांनी केली आहे. न्याय मिळाला नाही तर भीमशक्ती संघटना रस्त्यावर उतरल्यावर शिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विलास जाधव, युवक अध्यक्ष सुनील संसारे, तालुका उपाध्यक्ष अमोल काळे, कार्याध्यक्ष राहुल जाधव, सचिन खांडरे, सुरेश चौथमल, अरुण खंडीझोड आदी उपस्थित होते.