साईकिरण टाइम्स ब्युरो, 5 जून 2020
श्रीरामपूर | संपूर्ण महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्ह्यात चक्रीवादळाने सलग दोन दिवस धुमाकूळ घातल्याने संगमनेर तालुक्यातील हजारो एकर फळ बागेचे प्रचंड नुकसान झाले असल्याने फळ बागांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त फळबाग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वंजारी समाजाचे महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस तथा ओबीसी फाउंडेशनचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष समाजभूषण लक्ष्मणभाऊ उगलमुगले यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे आपले सरकार या पोर्टलवर केली आहे.
महाराष्ट्रात दोन दिवस चक्रीवादळ सुरू होते.चक्रीवादळाचा वेग इतका प्रचंड होता की,फळबागा उन्मळून पडल्या.फळांचे अतोनात नुकसान झाले.जवळ जवळ पन्नास ते सत्तर टक्क्यांपर्यंत फळ बागेचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.सध्या देशात कोरोना संकटामुळे शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेपर्यंत पोहचू न शकल्याने आगोदरच खूप नुकसान झाले होते.त्यात आता चक्रीवादळाने तडाखा दिल्याने सर्व नुकसान ग्रस्त फळबाग व इतर शेती मालाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी अहमदनगर व तहसिलदार संगमनेर यांना पाठविण्यात आलेली आहे.सरकार काय निर्णय घेणार ? याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.