साईकिरण टाइम्स ब्युरो, 9 जून 2020
मुंबई | कोरोनामुळे एखाद्या स्वस्त धान्य दुकानदारांचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला ५० लाख रुपयाचे विमा संरक्षण दिले जाईल तसेच मोफत तांदुळाचेही कमीशन लवकरच दिले जाईल, असे अश्वासन वित्त मंत्री नामदार अजित दादा पवार यांनी धान्य दुकानदारांच्या शिष्टमंडळांला दिले असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली आहे
कोरोनाच्या संकट काळात धान्य दुकानदार आपला जिव धोक्यात घालुन काम करत असल्यामुळे त्यांना विमा संरक्षण द्यावे, तामीळनाडू राज्याप्रमाणे दुकानदारांना वेतन देण्यात यावे, मोफत धान्य वाटपाचे कमिशन तातडीने देण्यात यावे, पाँज मशिनला येणाऱ्या अडचणी दुर करण्यात याव्यात. या मागणी करीता आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली १ जुलै पासुन संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता ; याबाबत सर्व संबधीतांना निवेदन पाठविण्यात आले होते. संपाचा आज नववा दिवस होता. धान्य दुकानदारांच्या संपाबाबत योग्य तो तोडगा काढण्यासाठी विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पुढाकार घेवुन वित्तमंत्री नामदार अजित दादा पवार याच्या समवेत बैठक लावुन घेतली.
यावेळी शिष्टमंडळासमोर बोलताना वित्तमंत्री नामदार अजित दादा म्हणाले की, सध्याची कोरोनाची गंभीर परिस्थिती पहाता दुकानदारांनी संप करणे योग्य नाही. एखाद्या दुकानदारांचा कोरोनाची बाधा होवुन मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला ५० लाख रुपयाचे विमा संरक्षण कवच दिले जाईल. तसेच मोफत धान्य वाटपाचे कमीशनही दुकानदारांना अदा करण्यात येईल. शासन धान्य दुकानदारा बाबत सकारात्मक असुन दुकानदारांनीही आपले काम चोख बजवावे. दुकानदारांनी तातडीने संप मागे घेवुन कार्डधारकांना मालाचे वाटप सुरु करावे, असेही ते म्हणाले. वित्तमंत्री अजित दादा पवार यांनी अश्वासन दिल्यामुळे धान्य दुकानदारांनी वाटप सुरु करावे, असे अवाहन जिल्हाध्यक्ष देविदास देसाई , सचिव रज्जाक पठाण, कार्याध्यक्षा मिनाताई कळकुंबे, विश्वासराव जाधव, बाबासाहेब ढाकणे, विजय दिघे, मोहीते पाटील, बाबा कराड, सुरेश उभेदळ, बजरंग दरंदले, माणिक जाधव, ज्ञानेश्वर वहाडणे, गजानन खाडे, गणपतराव भांगरे आदिंनी केले आहे.
मंत्रालय मुंबई येथे झालेल्या बैठकीस विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ, आमदार हिरामन खोसकर, आमदार नितीन पवार, विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे, नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे, सचिव गोपाल मोरे आदि उपस्थित होते.