विद्यार्थी करताहेत घरीच अध्ययन
साईकिरण टाइम्स ब्युरो, 8 एप्रिल 2020
बेलापूर|रुपेश सिकची |कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता विद्यार्थ्याना शासनाच्या वतीने सुट्टी देण्यात आली.यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अभ्यासक्रमाशी नाळ जुळलेली रहावी व विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेशी जुळलेला रहावा, यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक बेलापूर उर्दू शाळेने विद्यार्थ्यांसाठी व्हाट्स अप द्वारे लर्निंग फ्रॉम होम हा उपक्रम राबवीत आहे.
शिक्षण प्रक्रियेत शिक्षकाला अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु टाळेबंदीमुळे विद्यार्थी -शिक्षक यांचा प्रत्यक्ष संवाद पूर्णपणे थांबला आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास नियमित सुरू रहावा यासाठी बेलापूर उर्दू शाळेने व्हाट्स अप समूहाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी लर्निंग फ्रॉम होम ही अभिनव संकल्पना राबवली जात आहे. विद्यार्थ्याना घरीच राहून अभ्यास करता यावा यासाठी अनेक कल्पक व सृजनशील उपक्रम सुरू केले आहे.
इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या व्हाट्स अप नंबरवर दररोज शालेय अभ्यासक्रमावर आधारीत वेगवेगळे प्रश्न शाळेतील शिक्षक देत आहे. प्रश्नामध्ये उर्दू, मराठी व इंग्रजी विषयाच्या वाचन सरावासाठी मूळाक्षरे, जोडाक्षरे व विविध उतारे, गणितातील बेरीज,वजाबाकी,गुणाकार व भागाकार या क्रियांच्या सरावासाठी विविध उदाहरणे तसेेेच उर्दू व इंग्रजी विषयावरती वेगवेगळे प्रश्न दिले जातात. दररोज गृहपाठ तपासून चुकांची दुरुस्ती केली जाते व नंतर ऑनलाईन सराव परीक्षा घेतली जाते . 

श्रीरामपूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुनिल सूर्यवंशी साहेब व केंद्रप्रमुख उत्तम शेलार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लर्निंग फ्रॉम होम हे उपक्रम शाळेतील सर्व शिक्षक राबवित आहे.पालकांचाही या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.आपले पाल्य घरी राहून सुद्धा अभ्यास करीत आहे हे पाहून पालक ही अतिशय आनंदित आहे. शाळेचे मुख्याध्यापक जलील शेख, तसेच शिक्षक अनिस शेख, तरन्नुम खान, यास्मिन शेख, आजरा शेख, नशीबा बागवान, मेहरुनीसा खान, महेजबीन बागवान हे शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी परिश्रम घेत असतात.