साईकिरण टाइम्स ब्युरो, 24 मार्च 2020
श्रीरामपूर : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात चिंता निर्माण झाली आहे. याच प्राश्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात या निर्देशानुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. श्रीरामपूर शहरातील सर्व सीमा बंद करण्यात आल्याने जनावरांना चारा मिळत नसल्याने तात्काळ उपाययोजना करावी, अशी तातडीची मागणी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे श्रीरामपूर नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब गांगड, शामलिंग शिंदे, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, नगरसेवक दीपक चव्हाण, जितेंद्र छाजेड, संतोष कांबळे यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात बाळासाहेब गांगड, केतन खोरे यांनी म्हटले आहे की, कोरोना पासून मुक्तता मिळावी म्हणून शासनाने कडक पाऊले उचलली आहे. त्याचे स्वागत करणे गरजेचे आहे. श्रीरामपूर शहरात संचारबंदी लागू करण्यात आल्याने नागरिकांना अत्यावश्यक सेवांसाठी घराबाहेर पडता येणार आहे. पुढील २१ दिवस लॉकडाऊन असल्याने शहरातील शेतकरी, दुग्ध व्यावसायिक कमालीचे अडचणीत आले आहे. ग्रामीण भागातून शहरात येणारा गाय, म्हैस जनावरांचा चारा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पोलिसांच्या कारवाईच्या धाकाने चारा घेऊन येण्यास कोणीही धजावत नाही. ज्याप्रमाणे अन्न, पाणी मिळाल्याशिवाय माणूस जगू शकत नाही त्याचप्रमाणे चारा मिळाला नाही तर जनावरे दगावण्याची भीती निर्माण झाली असल्याचे गांगड व खोरे यांनी म्हटले आहे.
याचा थेट परिणाम अत्यावश्यक सेवा असलेल्या दुधाच्या व्यवसायावर, शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर आणि ज्यांना दूध मिळते अशा नागरीकांवरही होण्याची भीती नगरसेवक शामलिंग शिंदे, दीपक चव्हाण, जितेंद्र छाजेड, संतोष कांबळे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी गांभीर्याने याबाबत विचार करून श्रीरामपूरचे प्रांताधिकारी, पोलीस निरोक्षक साहेबांना जनावरांच्या चाऱ्याची वाहने शहरात येऊ देण्यास परवानगी द्यावी अशी मागणी गांगड, शिंदे, छाजेड, कांबळे, चव्हाण, खोरे यांच्यासह नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने केली आहे.