श्रीरामपूर | दत्ता खेमनर|विशेष प्रतिनिधी|
जिल्हयातील पाथर्डी तालुक्यात मल्हारी बटुळे या शेतकऱ्याने कर्जाबाजारीपणाला कंटाळून केलेली आत्महत्या ही महाविकास आघाडी सरकारचे पाप असुन या आत्महत्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कर्जमाफीची फसवी घोषणाच कारणीभूत असल्याची टीका भाजप नेते आ.राधाकृष्ण विखे यांनी केली.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर सडकून टीका केली. ठाकरे सरकारला लोकांच्या प्रश्नांपेक्षा सत्ता टिकवण्याचीच अधिक चिंता असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पदवीदान समारंभा नंतर आ.राधाकृष्ण विखे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “शेतकरी आत्महत्यांना सरकारच्या फसव्या घोषणा जबाबदार आहेत. राज्यातील लोकांच्या चिंता वाढत असताना महाविकास आघाडी सरकारला मात्र सत्ता टिकवण्याची चिंता अधिक असल्याकडे माध्यमांचे लक्ष वेधले. या आघाडी सरकारचं हे राजकारण महाराष्ट्रातील जनता बघत असल्याचे ते म्हणाले.
एकीकडे राज्य सरकार कर्जमाफीची घोषणा करत आहे, पण या कर्जमाफी योजनेतील कोणतीही स्पष्टता सरकार देवू शकलेले नाही.त्यामुळे शेतक-यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असुन, सरकार असेच जर धिम्या गतीने निर्णय घेत राहीले तर कर्जमाफी योजनेतील गोंधळामुळे गावपातळीवर उद्रेक होण्याची भिती त्यांनी व्यक्त केली. अवकाळीग्रस्त शेतक-यांना महाविकास आघाडी सरकार २५ हजार रुपयांची मदत करणार होते. सत्तेवर येण्यापुर्वी शेतक-यांचा सातबारा कोरा करु अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली होती पण एकाही आश्वासनांची पुर्तता या सरकारकडुन होत नसल्यामुळेच कर्जबाजारीला कंटाळुन राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरुच असल्याचे स्पष्ट करुन सरकारच्या कर्जमाफी योजनेतुन शेतक-यांना दिलासा मिळेल की नाही हा प्रश्न सर्वांच्याच समोर असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नगर जिल्ह्यातच नव्हेतर संपुर्ण महाराष्ट्रात वाळु माफीयांनी उच्छाद मांडला आहे. या वाळु माफीयांनी महसुल प्रशासनातील आधिका-यांनाच लक्ष केले आहे, आधिका-यांवर प्राणघातक हल्ले सुरु आहेत तरीही महसुलमंत्री त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. वाळु माफीयांच्या विरोधात कोणतेही धोरण घेतले जात नसल्यामुळेच एक प्रकारे वाळु माफीयांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असुन महसुल मंत्र्यांच्या तालुक्यातच वाळु माफीयांना संरक्षण मिळत असेल तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. प्रशासनातील आधिका-यांवर प्राणघात हल्ले करणा-या वाळु माफीयांच्या विरोधात मोक्का कायद्यांन्वये कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.
Tags
राजकीय
